गुदमरणाऱ्या श्वासांना गोरख बोडकेंचा “ऑक्सिजन” ; आमदार खोसकरांच्या हस्ते इगतपुरीत लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12
कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. हवेतील ऑक्सिजन शोषून रुग्णांना जीवदान देणाऱ्या स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन कॉन्सीसेटरचे 2 यंत्र गोरख बोडके यांच्या स्वखर्चातून लोकार्पण करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून गुदमरणाऱ्या अनेक श्वासांसाठी गोरख बोडके स्वतः ऑक्सिजन बनले आहेत. 2 ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर कोरोना रुग्णांचा बहुमोल जीव वाचणार आहे. ह्या अनोख्या जीवनदायी उपक्रमामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे संपूर्ण तालुक्यात विशेष कौतुक होत आहे.
सध्या कोरोनाचे थैमान प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. यामुळे इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि कोरपगाव कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे गंभीर असणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळत नाही. अनेकांचे प्राण ह्यामुळे धोक्यात आलेले आहेत. ऑक्सिजन संपल्यामुळे सध्या अनेकांची गैरसोय होते. ह्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी संवेदनशीलतेने आपल्या डॉक्टर मित्रांशी सखोल चर्चा केली. त्यांच्याशी सखोल चर्चेअंती गोरख बोडके यांनी ऑक्सिजन कॉन्सीसेटरच्या 2 मशीन स्वखर्चाने लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय कोरपगाव कोविड सेंटर येथे प्रत्येकी एक यंत्र देण्याचे ठरवण्यात आले. हे स्वयंचलित यंत्र हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन मेडिकेटेड ऑक्सिजन रुग्णांना हव्या त्या प्रमाणात पुरवठा करते. गोरख बोडके यांच्या दातृत्वामुळे ऑक्सिजनची कमतरता आणि टंचाई निर्माण झाल्यास अत्यवस्थ रुग्णांना वरदान मिळणार आहे. गोरख बोडके यांच्या ऑक्सिजनमुळे गुदमरणाऱ्या श्वासांना आयुष्य लाभणार असल्याने इगतपुरी तालुक्यातून विषेश कौतुक होत आहे.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या हस्ते आज इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मुख्याधिकारी निर्मला पेखळे, डॉ. प्रदीप बागल, वसीम सय्यद, पोपट भागडे, मदन कडू, विजय गडाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मानवता आणि संवेदना जपण्यासाठी ऑक्सिजन यंत्र

इगतपुरी तालुका अत्यंत गरीब असणारा आदिवासी तालुका आहे. ह्या तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण ऑक्सिजन नसल्याने अत्यवस्थ होतात. याकारणाने माणुसकी आणि संवेदना जपण्यासाठी ऑक्सिजन मशीन देऊन उत्तरदायित्व निभावले. अजूनही याबाबत चांगले काम करण्याचा मानस आहे.
श्री. गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!