इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट तहसीलदारांकडून अखेर सीलबंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी बीट हद्दीतील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अवतारसिंग हरनाम शेट्टी यांनी विनापरवाना रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये लोकांची गर्दी जमा केली. विवाहसोहळा आयोजित करुन शासनासह जिल्हाधिकारी नाशिक यांनी कोवीड-19 संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन केले आहे. मागील वर्षांपासून नियमभंग आणि विविध गुन्हे दाखल असूनही त्यांच्यात सुधारणा होत नाही. ह्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहा. घटना व्यवस्थापक तथा इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सीलबंद करण्याचा आदेश पारित केला. ह्या आदेशान्वये इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, इगतपुरीचे मंडळ अधिकारी सुरेंद्र पालवे, तलाठी राम तौर यांच्या पथकाने १० जून पर्यंत हे रिसॉर्ट सीलबंद केले आहे.

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की २ जूनला रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे घाटकोपर व गोरेगाव मुंबई येथील एकुण 10 व्यक्ती यांनी जिल्हाबंदीचे आदेश माहीत असतांनाही आदेशाचे पालन केले नाही. अत्यावश्यक काम नसताना व ई- पास न घेता त्यांनी हॉटेल रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे येऊन वास्तव्य केले. म्हणुन इगतपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

रेन फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक नामे अवतारसिंग हरनाम शेट्टी हे वारंवार शासनासह जिल्हाधिकारी यांच्या कोविड -19 विषाणूच्या संबंधित सूचना, मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आले आहेत. वेळोवेळी नोटीस तथा कारवाई करून देखील त्यांच्यात काही एक सुधारणा होत नाही. त्यामुळे  हॉटेल चालक हे वारंवार नियमाचा भंग करत असल्याने १० जून पर्यंत रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सिलबंद करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहा. घटना व्यवस्थापक तथा इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिले आहेत. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, इगतपुरीचे मंडळ अधिकारी सुरेंद्र पालवे, तलाठी राम तौर यांनी आपल्या पथकासह रिसॉर्टला सीलबंद केले.

रेन फॉरेस्ट रिसॉर्ट आणि त्यांचे मालक यांच्यावर फेब्रुवारीत नियमांचे उल्लंघन केल्याने  इगतपुरी पोलीस व तहसील कार्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी ३० हजार रक्कमेची दंडात्मक कार्यवाही केलेली आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी नाशिक यांनी कोविड 19 संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात विविध कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!