इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ ( किशोर देहाडे, इगतपुरी )
मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या प्रसूतीसाठी कसारा रेल्वे पोलिसांसह रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या महिलांनी सहकार्य केले. धावत्या रेल्वेगाडीत ही कठीण परिस्थितीत झालेली प्रसूती माणुसकीचा झरा अजून जिवंत असल्याचे मानले जात आहे. महिला आणि नवजात बाळ सुरक्षित असून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, सकाळी गोरेगाव येथे राहणारे राजाबाबू दास हे आपल्या गरोदर पत्नीसह आपल्या मूळ गावी कोलकाता येथे जात होते. उंबरमाळी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान राजाबाबू यांच्या गरोदर पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्या. या कठीण काळात गाडीतील महिला सहप्रवाशांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कसारा रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्याने राजाबाबू यांनी स्थानकातील पोलिसांना मदतीसाठी विनंती केली.
यावेळी कर्तव्य बजावत असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, महिला पोलिस कर्मचारी पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा बलच्या महिला कर्मचारी स्वाती मेश्राम यांनी तात्काळ गीतांजली एक्स्प्रेसमध्ये असलेल्या गरोदर मातेकडे धाव घेतली. पण या धावपळी दरम्यान गरोदर मातेची प्रसूती झाली. महिला पोलिसांनी दक्षता घेत त्या महिलेला रेल्वे डब्यातून सुखरूप खाली उतरवले. प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानका जवळील देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेत प्रसूत महिलेच्या बाळाचे पुढील सोपस्कर पार पाडले.
प्रसंगावधान राखीत रेल्वे पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळ यांना तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरु केले. माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.राजाबाबू दास आणि महिलेने पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र वाळुंज आदींसह मदत करणाऱ्यांचे आभार मानले.