इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
मुंबई आग्रा महामार्गावरून वैध कारण असेल अथवा प्रवासाचा पास असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. महामार्गावरून विनाकारण भटकत असल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासह कोविड अँटीजेन रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास तातडीने इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक विश्वजित पाटील यांनी वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासह ही मोहीम सुरू केली आहे.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वैध कारण असेल अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीचा ई-पास काढला असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडणे आवश्यक आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.
मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे कौटी फाटा येथे पोलीस पथकासह होमगार्ड पेठ आणि त्र्यंबक पथक कार्यान्वित असून प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे यांच्या पथकाने नाकाबंदी केली आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वाडीवऱ्हेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर कोविड अँटिजेन तपासण्या करण्यात येत आहेत. बाधित असणाऱ्या व्यक्तींना कोरपगाव कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. यावेळी संचारबंदीची अंमलबजावणीही कठोरपणे केली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या तसेच अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत.
पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश अहिरे, राजेंद्र कचरे, पोलीस हवालदार भाऊसाहेब भगत, पोलीस शिपाई सोमनाथ बोराडे, होमगार्ड त्र्यंबक, पेठ पथक यांच्याकडून सक्रीयतेने कार्यवाही केली जात आहे.
नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर विनाकारण प्रवास करणाऱ्यांवर अंकुश ठेवून कोविड नियमांचे तंतोतंत अनुपालन करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. टेस्टमध्ये बाधित सापडल्यास इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे संबंधितांना दाखल केले जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
- विश्वजित जाधव, पोलीस निरीक्षक वाडीवऱ्हे