इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ ( विशेष प्रतिनिधी )
‘तौकते’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी किनाऱ्या लगत असलेल्या वस्ती मधील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन प्रशासनाचा आढावा घेतला आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता ‘तौकते’ वादळ येत आहे. अशात अरबी समुद्रात तयार झालेलं ‘तौकते’ चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्ष रहावे, मुसळधार पाऊस आल्यास घराबाहेर न जाता सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळाचा धोका लक्षात घेता, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने यापूर्वीच दिला आहे. यासोबतच मच्छीमारांनी बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्या नीट बांधून ठेवाव्यात. या कालावधीत पालघर जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार निकोले यांनी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच किनारपट्टीवर नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास आमच्या पक्षाचे कॉ. महेंद्र दवणे, कॉ. धनेश अक्रे यांना संपर्क करावा, आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करण्याचे पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही आमदार निकोले यांनी भेटी दरम्यान आलेल्या नागरिकांना दिली.
दरम्यान चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली असता या पार्श्वभूमीवर हवामान शास्त्र कार्यालय डहाणू येथून माहिती घेऊन आगर, नरपड, चिखला, डहाणू गाव आदी किनारपट्टीला भेट देऊन आमदार विनोद निकोले यांनी येथील कोळी बांधवांबरोबर चर्चा केली व अधिकाऱ्यांसाहित वस्तुस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राहुल सारंग, पोलीस निरीक्षक कदम, डहाणू नगरपरिषद उप मुख्याधिकारी जोशी, माकप पदाधिकारी कॉ. चंद्रकांत गोरखाना, डॉ. आदित्य अहिरे, कॉ. महेंद्र दवणे, कॉ. धनेश अक्रे आदी उपस्थित होते.