इगतपुरीनामा दि. १२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे मे २०२१ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. तथापि, कोविड १९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. परीक्षा रद्द झाल्याचे माध्यमांमधून जाहीर करण्यात आले असले तरी शालेय शिक्षण विभागाकडून तसा अधिकृत शासन निर्णय पारित होणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आज परीक्षा रद्द केल्याचा अधिकृत शासन निर्णय पारीत केला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परिक्षेशी संबंधित सर्व घटकाचे हित लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. इयता दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येणार असल्याचेही सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी बारावीच्या बाबतीत मात्र परीक्षा होणार की नाही आणि होणार असेल तर कधी होणार कोणत्या स्वरूपात होणार या सर्व बाबतीत अजूनही संभ्रम कायम असून बारावी परीक्षा प्रक्रियेबाबतही लवकरात लवकर माहिती जाहीर करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.