प्रखर आत्मविश्वासाच्या बळावर जबाबदाऱ्या पार पाडून महिला दिमाखदार करिअर करू शकतात – डॉ. शर्मिला कुलकर्णी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके. महिला महाविद्यालयात आज जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.शर्मिला कुलकर्णी म्हणाल्या की, प्रखर आत्मविश्वासाच्या बळावर जबाबदाऱ्या पार पाडून महिला दिमाखदार करिअर करू शकतात. कार्यकमात विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, शारीरिक आत्मविश्वासाबरोबरच मानसिक आत्मविश्वास अधिक गरजेचा आहे. महिलेला तिचा योग्य दर्जा मिळवून देणे गरजेचे आहे. संधी, स्वप्र व स्वप्नपूर्तीची चिकाटी यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. येणारी संधी कधी ही सोडू नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

कोरोनाच्या काळात आलेल्या संकटांचे संधीत रूपांतर करा असेही त्या शेवटी म्हणाल्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा समन्वयकहेमांगी पाटील होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ. नीलम बोकिल यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून परिचय करून दिला. यावेळी त्यांनी स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश्य स्पष्ट करून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची कर्तृत्वशाली परंपरा स्पष्ट केली. ह्याप्रसंगी महाराष्ट्राच्या जिल्हा क्रीडा विभागातर्फे ‘स्वयंसिद्धा’ ह्या स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पूनम गुरव ह्यांनी ध्वनिचित्रफीतीद्वारे ह्या प्राशिक्षण शिबीराची माहिती देऊन काही प्रात्यक्षिके सादर केली. हेमांगी पाटील ह्यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आधुनिक स्त्री ने स्वतःच्या रक्षणासाठी स्वयंसिद्ध, समर्थ असले पाहिजे. महिला दिन ह्या प्रशिक्षणाचा आरंभ करण्यासाठी निवडला हे खूप औचित्यपूर्ण आहे असे त्या म्हणाल्या.

ह्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन इथेच अध्यापन कार्य करणाऱ्या डॉ. सिंधु काकडे, छाया खुळगे, शोभा लोणकर  वैशाली चौधरी, वैशाली गायकवाड, संज्योत अहिरवार , प्रा. सायली आचार्य ह्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते झाला.
ह्याप्रसंगी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थिनींचा ही गौरव करण्यात आला. कु। चैत्राली ढवळे, रिया विश्वकर्मा, केतकी गोरे, सोनाली कोंबडे, सारिका भिसे, शाश्वती चव्हाण, दीपाली खुळे ह्या विद्यार्थिनी विद्यापीठात गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या परिस्थिती बद्दल विचार व्यक्त केले. शहरी भागातील स्त्रीला सुद्धा सन्मान मिळत नाही ह्या बद्दलची खंत व्यक्त केली. लैंगिक विषमता दूर करण्याचे एक साधन शिक्षण आहे असे त्या म्हणाल्या. हे  महाविद्यालय ही दरी दूर करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे. महिलांचा विकास म्हणजे अर्ध्या भारताचा किंवा अर्ध्या जगाचा विकास आहे हे त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले. विद्यार्थिनी सभा प्रमुख जिमखाना प्रमुख क्रीडा संचालक डॉ. कविता खोलगडे ह्यांनी   उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. आश्लेषा कुलकर्णी, डॉ. सायली आचार्य ह्यांनी केले. उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!