ऐन परीक्षा काळात महावितरणची ‘बत्ती गुल’ ; मान्सूनपूर्व कामे ठरताहेत विद्यार्थ्यांची डोकेदुखी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )
विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये महावितरणमुळे अनेक अडचणी येत आहेत. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून धोकादायक असलेली कामे करण्यात येत आहेत. वाढलेल्या झाडांना तोडण्यासाठी साधारण चार-सहा तास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतरही विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. इगतपुरी तालुक्यात महावितरणच्या बत्ती गुल प्रकारामूळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत
कोरोना परिस्थितीमुळे सर्वच परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे सर्व परीक्षा घरून द्याव्या लागत आहेत. ऐन परीक्षेच्या वेळेसच महावितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची पुरती दमछाक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात येत असल्याने वेळेवर विद्यार्थ्यांची फजिती होत आहे. परिणामी वेळेवर वीजपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणी मित्रमंडळी यांचा सहारा घेऊन परीक्षा द्यावी लागते.
मोबाईल कंपन्यांचे बरेचसे टॉवेर विजेशी जोडलेले आहेत. काहींना ‘पॉवर बँक अप’ नसल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास कनेक्टिव्हिटी देखील जात असल्याने बऱ्याच अडचणी येतात. अवकाळी पावसाने थैमान घातलेले असून पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास हानी टाळण्याच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात येत असतो. वीज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील अशा प्रकारची कामे तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. विजेच्या लपंडावाने परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे याची पूर्वकल्पना दिल्यास वणवण थांबेल. आधीच कोरोनामुळे आणि उन्हामुळे विद्यार्थी संतप्त आहेत.
कल्पना गव्हाणे, परीक्षार्थी विद्यार्थिनी