

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० ( किशोर देहाडे, इगतपुरी )
शेकडो टॅक्सीचालक आणि मालकांची जीवन वाहिनी असणाऱ्या रेल्वे लोकलसेवा बंद असल्याने संबंधित कुटुंबे मोठ्या अडचणीत सापडली आहेत. जगण्यासाठी लढाई करावी की टॅक्सीच्या कर्जाचे हप्ते भरावे अशी चिंता सर्वांना पडली आहे. कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था हप्त्यासाठी तगादे लावत आहे. वातावरण सुरळीत झाल्याने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी खासगी कर्ज घेतले असतानाच नव्याने निर्बंध लागल्याने टॅक्सीवाले त्रस्त झाले आहेत. टॅक्सीवरील कर्जाचे थकीत हप्ते वित्तीय संस्थेचे करार संपल्यानंतर वसूल करण्याबाबत शासनाने आदेश काढावा अशी मागणी कसारा-नाशिक टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कर्डक, राजेंद्र उबाळे, अध्यक्ष गौतम उबाळे, सचिव शरिफ पठाण यांनी केली आहे. फायनान्स कंपन्यांचा ससेमिरा थांबवून रिक्षावाल्यांप्रमाणे आर्थिक मदत करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
आधीच एक वर्ष मेटाकुटीला आलेल्या सामान्य नागरिकांना जगण्याची भ्रांत पडली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य हातांवर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची फरफट वाढत आहे. संपूर्ण रेल्वे बंद असल्याने मुंबईची लाईफ लाईन लोकलच्या सर्वच फेऱ्या बंद आहेत. लोकल सेवेवरच कित्येक कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. अनेकांच्या सायंकाळी चुली पेटवणाऱ्या लोकलच बंद असल्याने चुलीच थंडावल्या आहेत.
कसारा, नाशिक, इगतपुरी, घोटी, राजूर,खोडाळा येथील अनेकांचे जीवन लोकल वर अवलंबून आहे. लोकलच बंद असल्याने सर्वच ठप्प झाले. गेल्या वर्षी दिलीप सुभाष पंडित या युवकाने उपासमार व बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुन्हा लॉकडाऊन करून जिल्हा बंदी केली. यामुळे कसारा ते नाशिक टॅक्सी चालक मालक व टॅक्सी भरुन देणारे युवकांचे हाल होत आहेत. कुटुंबांचे पोट कसे काय भरायचे हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. शासनाने फायनान्स कंपन्यांचा ससेमिरा थांबवुन लॉकडाऊनच्या काळात थकीत झालेले टॅक्सी वरिल कर्जाचे थकीत हप्ते हे करारनामा संपल्यानंतर देण्यात येतील असा सक्तीचा आदेश काढावा. टॅक्सी चालक मालकांनाही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कसारा-नाशिक टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कर्डक, राजेंद्र उबाळे, अध्यक्ष गौतम उबाळे, सचिव शरिफ पठाण यांनी केली आहे