१८ पर्यंतच्या मुलांसाठी ग्रामीण रुग्णालयात ५ बेड आरक्षित : श्री साई सहाय्य समितीच्या मागणीला यश

इगतपुरीनामा न्यूज । दि. १० (वाल्मिक गवांदे) :
तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीने तालुक्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाल्यास उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाच बेड राखीव ठेवावेत अशा आशयाचे निवेदन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांना दिले आहे. डॉ. देवरे यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या २-३ दिवसात मुलांसाठी ५ बेड आरक्षित करणार असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी बहुतेक मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मात्र लहान मुलांमध्येही लक्षणे दिसून येत असून लहान मुलांपासून कोविड संसर्ग प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताप, सर्दी, खोकला, कोरडा खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, जेवण नीट न जेवणे, थकवा जाणवणे, शरीरावर पुरळ उठणे, श्वास घेताना अडचण जाणवणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे यांनी केले आहे.