कवी : प्रकाश कवठेकर
ग्रामसेवक कोरपगाव
संवाद : 9860702169
“बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोराटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
( कवी प्रकाश कवठेकर हे इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः रेखाटलेली विविध चित्र जागतिक दर्जाचे असून विविध बक्षिसांनी कवी सन्मानित होत असतात. )
4 Comments