गोंदे दुमाला येथे २८ लाख ८० हजार रुपये किंमतीची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त ; ३ जणांवर गुन्हा दाखल 

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना गोंदे दुमाला येथील मे. ग्लोबल टोबॅक लेगसीच्या गोडावून मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, साठा, वाहतूक वितरण यासाठी प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा असल्याच्या माहितीच्या आधारे बुधवारी छापा टाकण्यात आला. छापा कार्यवाही दरम्यान महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात  उत्पादन, विक्री, साठा, वाहतूक वितरण यासाठी प्रतिबंधित केलेली २८ लाख ८० हजार रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू ताब्यात घेण्यात आली. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला नाशिकचे अन्न सुरक्षा अधिकारी तथा सहआयुक्त गोपाळ विजय कासार यांनी प्रतिबंधित तंबाखू कब्जात बाळगणारे कुश चरण स्वाई, प्रदीप कुमार, प्रेम पवार यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरुद्ध भा. न्या. संहिता २०२३ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, हवालदार श्रीकांत दोंदे, केशव बस्ते करीत आहेत.

error: Content is protected !!