आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

६ जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सन १८३२ मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण” सुरू केले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजाला दिशा देणे, सत्याचा शोध घेणे आणि समाजहितासाठी आवाज उठवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर आचार्य जांभेकरांचे पत्रकारितेमधील योगदान आणि आजच्या पत्रकारांनी पाळावयाची नैतिकता यांचा विचार करणे आवश्यक ठरते. ६ जानेवारी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राने समाज जागृतीचे कार्य केले.  दर्पण’च्या पहिल्या अंकात इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये माहिती दिली जात असे. यामुळे इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी व भावना समजून घेता आल्या. ‘दर्पण’ने समाजातील अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यांविरुद्ध आवाज उठवला आणि लोकांना जागरूक केले. या वृत्तपत्राने साडे आठ वर्षे कार्य केले आणि १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी दिग्दर्शन हे वृत्तपत्रही सुरू केले होते. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करून त्या माध्यमातून एतद्देशिय समाजाला प्रबोधित करण्याच्या केलेल्या कार्यामुळे त्यांना दर्पणकार म्हणून संबोधले जाते. जांभेकरांनी पत्रकारितेद्वारे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध त्यांनी लेखन केले. ब्रिटिश काळात त्यांनी लोकांना स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची जाणीव करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय चेतना जागृत केली. पत्रकारितेला त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवले. त्यांच्या लेखनात सत्य, विवेक आणि समाजहित यांचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांना “मराठी पत्रकारितेचे जनक” ही उपाधी मिळाली.

आजच्या काळात पत्रकारिता अधिक व्यापक झाली आहे. छापील माध्यमांबरोबरच दूरदर्शन, रेडिओ, डिजिटल पोर्टल्स आणि सोशल मीडिया हे नवे माध्यम उपलब्ध झाले आहेत. या बदलत्या परिस्थितीत पत्रकारांनी काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बातमी देताना तथ्यांची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवणे टाळावे. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष वृत्तांकन करणे ही पत्रकाराची जबाबदारी आहे. बातमी ही केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी नसून समाजहितासाठी असावी. पत्रकारितेत वापरली जाणारी भाषा स्पष्ट, सोपी आणि शुद्ध असावी. चुकीची भाषा जनमानसात गोंधळ निर्माण करू शकते. व्यक्तीगत गोपनीयता आणि संवेदनशील माहिती यांचा आदर राखणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे, परंतु त्याचा वापर करताना नैतिकता आणि जबाबदारी पाळणे गरजेचे आहे. पत्रकारितेची नैतिकता ही तिच्या विश्वासार्हतेचा पाया आहे.पत्रकाराने सत्याला प्राधान्य द्यावे. कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे बातमी देणे. समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्य करणे. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक बाबींमध्ये संवेदनशीलता राखणे. पत्रकारितेने लोकशाही मजबूत करावी, जनतेला माहितीपूर्ण करावे. आजचा पत्रकार दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आचार्य जांभेकर यांचे कार्य आजही प्रासंगिक आहे. त्यांच्या विचारधारेला आधुनिक पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात महत्त्व आहे. त्यांच्या कार्यामुळे पत्रकारितेत एक नैतिक आधार तयार झाला, जो आजही पत्रकारितेचा आधारभूत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेतील वारसा आणि कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी पत्रकारितेला समाजजागृतीचे साधन बनवले. आजच्या पत्रकारांनी त्यांच्या आदर्शांचा विचार करून सत्यनिष्ठा, निष्पक्षता आणि समाजहित यांचा आग्रह धरावा. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, हा स्तंभ मजबूत राहणे, हे पत्रकारांच्या नैतिकतेवर अवलंबून आहे. ( सौजन्य – जिमाका, सोलापूर )

error: Content is protected !!