त्र्यंबकेश्वरच्या बेवारस मयत महिला खूनप्रकरणी मारेकऱ्याला अटक : ग्रामीण एलसीबी आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांची धडक कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – २४ डिसेंबरला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या रकडेला पडित जागेत ४० वर्षीय अनोळखी महिला मयत अवस्थेत सापडली. तिच्या डोक्यावर दगडाने वार झाल्यामुळे गंभीर दुखापत व रक्तश्राव झाल्याने ती मयत अवस्थेत मिळून आली. याबाबत त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी ह्या घटनेचा आढावा घेवुन हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सपोनि नितीन रणदिवे, हवालदार सचिन गवळी, संदिप नागपुरे, प्रविण काकड, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे, तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्ड, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक  राजेश गावित, हवालदार सचिन जाधव, शांताराम निंबेकर, सुदेश घायवट, सचिन गांगुर्डे, भारत भावले, अमोल बोराडे, निता ब्राम्हणे, बच्छाव यांच्या पथकाने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे. पोलीस पथकांनी घटनास्थळ व मृतदेहाचे बारकाईने पाहणी केली. मृतदेहाच्या शरीरावर मिळुन आलेले कपडे व वर्णन यावरुन त्र्यंबकेश्वर शहर भागात गुप्त बातमीदारामार्फत मयत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार ही मयत महिला त्र्यंबकेश्वर येथे भंगार गोळा करण्याचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यावरुन मयत महिलेच्या सोबत राहणारी महिला चांगुना देवराम भगरे हिचा त्र्यंबकेश्वरला शोध घेतला असता ती मिळुन आली. तिच्याकडे विचारपुस केल्यावर मयत महिलेचे नाव झुणकाबाई सिताराम वाघ वय ५२, रा. ब्राम्हणवाडे, ता. त्र्यंबकेश्वर आहे असे समजले. मिळून आलेल्या महिलेचा मुलगा पांडुरंग देवराम भगरे हा देखील भंगार गोळा करण्याचे काम करतो. तो तीन दिवसांपासुन बेपत्ता असल्याबाबत माहिती मिळाली. म्हणून पथकाने त्याचा शोध घेवुन संशयित आरोपी पांडुरंग देवराम ( गोविंद ) भगरे वय ३५, रा. सामुंडी ता. त्र्यंबकेश्वर सध्या राहणार  गुरुव्दाराजवळ त्र्यंबकेश्वर याला ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, यातील मयत महिला काही दिवसांपासुन आरोपी व त्याचे आई सोबत भंगार गोळा करुन विकी करण्याचे काम करत होते. सर्वांना दारुचे व्यसन असल्याने भंगार विक्री करुन मिळालेल्या पैशातुन दारुचे सेवन करत असत. २३ डिसेंबरला रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपी याने दारुच्या नशेमध्ये मयत महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मयत महिलेने त्याला विरोध केल्याने आरोपीने तिच्या डोक्यात दगडाने मारल्याबाबत कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी करीत आहेत.

error: Content is protected !!