“असे” असेल इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – प्रदीर्घ काळापासून इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीच्या १० गणांची निवडणूक रखडलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अनेकदा पूर्वतयारी करूनही निवडणुका होत नसल्याने नाराजीचा सूर पसरला होता. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे, पक्षांतर, चढाओढी झाल्याने परिस्थिती बदलत गेली. आरक्षणाबाबत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे अनेकांनी निवडणुकीचा नाद सोडून दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नव्या वर्षातील जानेवारी अखेर पर्यंत ह्या निवडणुका होणार असल्याने पुन्हा एकदा इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या काही दिवसात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सर्वजण कामाला लागून निवडणूक जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. इगतपुरी तालुक्यात इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी शप, शिवसेना उबाठा, भाजपा, राष्ट्रवादी अप, शिवसेना शिंदे, मनसे, वंचित बहुजन आघाडी, माकप, शेकाप, स्वराज्य, रिपाई आदी राजकीय पक्ष आहेत. महाविकास आघाडी, महायुती एकत्र निवडणुका लढतील की त्यांचे घटक पक्ष स्वतंत्रपणे लढतील हे अद्याप निश्चित नाही. म्हणून प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या वाढत आहे. उमेदवारी मिळावी म्हणून संभाव्य उमेदवारांनी लॉबिंग लावायला सुरुवात केली आहे.

इगतपुरी तालुक्यात खंबाळे ( जुना शिरसाठे गट ), धामणगाव ( जुना खेड गट ), नांदगाव सदो, घोटी बुद्रुक, वाडीवऱ्हे हे ५ जिल्हा परिषद गट आहेत. यापैकी फक्त घोटी बुद्रुक हा गट सर्वसाधारण किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होऊ शकतो. लोकसंख्येच्या निकषानुसार अन्य ४ गटांवर अनुसूचित जमातीचे आरक्षण पडेल असा खात्रीलायक अंदाज आहे. इगतपुरी पंचायत समितीचे धामणगाव ( जुना टाकेद बुद्रुक गण), काळूस्ते, मुंढेगाव, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, घोटी, खंबाळे, कावनई ( जुना शिरसाठे गण ), बेलगाव तऱ्हाळे ( जुना खेड गण ), साकुर ( जुना नांदगाव बुद्रुक गण ) हे १० गण आहेत. यापैकी ५ गणात अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित होणार आहेत. उरलेल्या ५ गणांपैकी २ गण सर्वसाधारण, १ गण नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि १ गण अनुसचित जाती यासाठी आरक्षित होणार आहे. यामध्ये शिरसाठे, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, साकुर, मुंढेगाव ह्या गणांचा समावेश होतो. सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने ज्या गणात हे आरक्षण पडेल तिथून तालुक्याचे सभापती निश्चित होतील. आरक्षण सोडतीनंतर निश्चित केलेल्या आरक्षणनंतर महिलांचे आरक्षण नक्की होणार आहे. यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी पावले उचलली जातील. बदलणाऱ्या आरक्षणामुळे अनेकांची गोची होणार आहे. अनेकांनी आतापासूनच कामाला लागून नियोजन सुरु केले आहे. येणारी दिवाळी निवडणुकमय होणार असल्याने पुन्हा एकदा मतदार राजा प्रकाशझोतात येईल.

error: Content is protected !!