डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या देशाच्या माजी शिक्षण सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचच्या संस्थापक व मुख्य संयोजक डॉ. कुमुद बन्सल यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण सेंटरकडून गेल्या दोन वर्षापासून डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यावर्षीचे नामांकन सुरू करण्यात आले असून शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या जास्तीत जास्त शिक्षकांची नामांकने दाखल करावीत असे आवाहन शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक तथा राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनी केले आहे.

या पुरस्कार प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे कोणत्याही शिक्षकाने स्वतःच स्वतःचे नामांकन दाखल करायचे नसून उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना ओळखणाऱ्या, त्यांच्या कामाची व्यवस्थित माहिती असणाऱ्या शाळा किंवा त्या शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी अंगणवाडी सेविका, यांच्यासह सर्वसामान्य ग्रामस्थ किंवा अगदी विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा शिक्षकांचे नामांकन दाखल करू शकणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर कडून नामांकनासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. आजपासून १७ ऑक्टोबर पर्यंत नामांकन दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली असून प्रत्यक्ष पुरस्कारांचे वितरण 4 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिक्षकांचे काम प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी हे नामांकन दाखल करायचे आहे. नामांकनासाठी 17 ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर निवड समितीची पुढील प्रक्रिया सुरू होईल. राज्यभरातून एक पुरुष शिक्षक आणि एक महिला शिक्षिका असे प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येणार असून 21 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांनी स्वतःचे नामांकन दाखल करू नये. शिवाय नामांकन मिळालेल्या शिक्षकांनी ऑनलाइन मुलाखतीस उपस्थित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ते काम करत असणाऱ्या शाळांना प्रत्यक्ष भेट दिली जाईल त्यावेळी त्यांच्या कामाची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या शाळांमधून पहिले ते बारावी साठी अध्यापन करणाऱ्या, प्रत्यक्ष शिकवण्याचा किमान दहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या आणि कमाल वयोमर्यादा 55 असणाऱ्या शिक्षकांसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे नामांकन दाखल करतांना या सर्व बाबींचा विचार करूनच नामांकन दाखल करावे. अधिक माहिती साठी संजना पवार यांच्याशी 8291416216 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!