
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्रीसदो येथे पिर सद्रोदीन बाबा दर्गा येथे १२ ते १५ सप्टेंबर पर्यंत उरुस / यात्रा संपन्न होणार आहे. हा उरुस दरवर्षीप्रमाणे सामाजिक सलोखा ठेवून शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सारिका अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत इगतपुरी शहरात निघणारी संदल मिरवणुक व पिंप्रीसदो गावातील ऊरुस यात्रा काळात शांततेच्या मार्गाने उत्सव पार पाडावा. ढोल ताशा अगर वाद्य परवानगी ही रात्री २२.०० वाजेपर्यत देण्यात आली आहे, पिंप्रीसदो गावात ढोलताशा अगर डीजे वाद्यास बंदी केल्याने गावात कोणतेही वाद्य वाजवले जाणार नाही. धुमाळ कार्यक्रमाचे वेळी ज्या लोकांचे नवसाचे मुल आहे. त्यांच्या सोबत एकच व्यक्तीला दर्गा परिसरात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे इतर कोणीही लोकांनी गर्दी करु नये. पिण्याचे पाणी, शौचालय व वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी. हा ऊरुस शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे याबाबत बैठकीत सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वीज मंडळाचे सी.आर. चव्हाण, इगतपुरी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक रमेश राठोड, उत्पादन शुल्क विभागाचे सागर इंगळे, वैद्यकीय अधिकारी शुभांगी हिवाळे, पिंप्रीसदो ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, अमोल गायधनी, माजी सभापती कावजी ठाकरे, दर्गा व मस्जिद ट्रस्टी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पोलीस अंमलदार विनोद गोसावी, निलेश देवराज, महेद्र गवळी आदी उपस्थित होते.