
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वैतरणानगर परिसरात दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असल्याने ह्या भागात भीती पसरली आहे. पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने अंधार पडल्यानंतर बाहेर पडायला लोकांना विचार करावा लागतो आहे. जंगल वस्ती आणि शेतीचे क्षेत्र वाढल्याने वैतरणानगर परिसर बिबट्यासाठी पोषक ठरत आहे. परिणामी या भागातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर नागोसलीचे उपसरपंच अशोक दत्तू शिंदे यांच्याकडे अनेक ग्रामस्थांनी गाऱ्हाणे मांडले. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन अशोक शिंदे यांनी इगतपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि स्थानिक वन परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यनाशिक तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे वैतरणानगर भागातही बिबट्याच्या दहशतीमुळे संताप निर्माण झालेला आहे. म्हणून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी त्यांनी मागणी केली. त्यांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देऊन वन विभागाने पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अन्य ठिकाणावरून पिंजरा आणण्यासाठी आर्थिक व्यवस्था व्हायला वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी अप्राप्त आहे. म्हणून उपसरपंच अशोक शिंदे यांनी अडचण लक्षात घेत स्वखर्चाने पिंजरा आणण्याची व्यवस्था करून दिली आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांनी अशोक शिंदे यांचे आभार मानले आहेत. आज पिंजरा लावण्यात आला असून लवकरच बिबट्या जेरबंद होईल असा विश्वास अशोक शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी नागोसलीचे सरपंच काशिनाथ होले, धारगावचे सरपंच पांडुरंग पुंजारा, ग्रा. पं. सदस्य रंजन गोवर्धने उपस्थित होते.