
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भुषण व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच म्हणून कैलास कडू यांनी केलेल्या ग्रामविकासासाठी सर्वोत्तम योगदान, गावाचा शाश्वत विकास आणि समाजाच्या विधायक कार्यामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी देशातील एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोनडे, मुख्य आयोजक डॉ. मनीष गवई यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन, सेंट्रल ह्यूमन राईट्स संघटन दिल्ली, इंडियन गॅलक्सी फाउंडेशन, विश्व सिंधी सेवा संघम यांच्यातर्फे हा मानाचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सरपंच कैलास कडू हे शेणवड बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत खडकवाडी ह्या छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून गावाचे सरपंचपद भूषवत आहेत. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आज मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावकऱ्यांना समर्पित करतो. यापुढेही गावासाठी सातत्याने सेवा करण्याची ताकद ह्या पुरस्काराने दिली असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.