
इगतपुरीनामा न्यूज – नाबार्डच्या आर्थिक सहकार्याने व बायफ लायलीहूड नाशिक यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह सह्याद्री पाणलोट क्षेत्र सामाजिक संस्था खेड कानडवाडी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या समन्वयाने खेड भैरव येथे भात लागवड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. खेड येथील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात भात लागवडीच्या प्रशिक्षणाआधी गावातील शेतकऱ्यांना सुधारित भात लागवड प्रात्यक्षिकासाठी भात बियाणे, युरिया ब्रिकेट यांचा लाभ देण्यात आला. त्या धर्तीवर भात लागवड प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. उपस्थित शेतकऱ्यांना बायफ संस्थेचे प्रशिक्षक प्रशांत बोराडे यांनी रोपवाटिका, रोप व्यवस्थापन, भात लागवडीच्या पद्धती, चारसुत्री पद्धतीने भात लागवडीचे महत्त्व, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात इगतपुरी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्धल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. उप कृषी अधिकारी किशोर भरते यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात शेतकरी अपघात विमा योजना, ॲग्री स्टॅक आदीबाबत सविस्तर माहिती सांगितली. यानंतर खेड येथील शेतकरी शिवाजी वाजे यांच्या शेतावर चार सूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कार्यक्रमासाठी बायफ संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे, प्रकल्पाधिकारी प्रशांत बोराडे, आकाश जाधव, बाबासाहेब गोरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, उप कृषी अधिकारी किशोर भरते, ग्रामविकास अधिकारी पुष्पा धिंदळे सह्याद्री पाणलोट क्षेत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोविंद धादवड, शिवाजी वाजे यांनी प्रयत्न केले. ह्या प्रशिक्षणाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.