
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योग सत्रात महात्मा गांधी हायस्कूलचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगगुरू डॉ. प्रदीप बागल आणि किशोर मुळे यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थीदशेपासून योगसाधना आत्मसात केल्यास मानसिक एकाग्रता, आत्मिक शक्ती आणि शारीरिक आरोग्य सुधारते असे सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इगतपुरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाचे निलेश देवराज यांनी प्रभावीपणे केले.