
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण करणाऱ्या पाडळी देशमुख जवळील सीडीएस कंपनी बाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणाऱ्या मिलरने एका दुचाकीस्वाराला फरपटत नेत कमरेवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोटारसायकलस्वार सोमनाथ गंगाराम खडके, रा. पिंपळगाव भटाटा वय २० हा वाघोबावाडीकडून महामार्गाकडे मोटारसायकलने जात असताना काँक्रीटीकरणाच्या मिलरने त्याला फरपटत नेले. त्याच्या कमरेवरून चाक गेल्याने तो जागीच मयत झाला. यामुळे गाडी चालक तसेच कंपनीतील सर्व कामगार हे पळुन गेल्याने वातावरण काही काळ तापले होते. मयत सोमनाथ खडके याचे काका गोविंद हंबीर, नारायण हंबीर व मावसभाऊ सागर हंबीर यांनी मयताच्या कुटुंबाला मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलुन न देण्याचा पवित्रा घेतल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. गोंदे येथील नरेंद्रचार्य संस्थांनच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास ६ महिने झाले मात्र सीडीएस कंपनी मनमानी पध्दतीने काम करीत आहे. अनेकदा ओरड होऊनही कंपनी कामात गती आणत नाही. कुणाचाही वचक नसल्याने दररोज अपघात घडत आहे. आज एकाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.