घोटी येथील जनता विद्यालयाच्या १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरवली एक दिवसाची शाळा : अनोख्या स्नेहसंमेलनात सर्वांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील जनता विद्यालयात १९९५ मध्ये शिकणाऱ्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत एक दिवसाची शाळा भरवली. ज्या शालेय इमारतीत शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्या कृतज्ञतेतुन ५१ मित्र मैत्रिणींनी पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरवला. यावेळी शाळेची प्रार्थना म्हणतांना मन बालपणात हरवून राष्ट्रगीतावेळी कडक शिस्त आठवली. वर्गात प्रवेश करतेवेळी हातावर छडी तर रोल नंबर प्रमाणे हजेरी घेण्यात आली. ह्या अनोख्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन भाऊराव जाधव, संतोष सोनार, धीरज पिचा, उत्तम गव्हाणे, नितीन चुंबळे, बाळासाहेब जाधव, प्रीती शाह यांनी केले होते. ३० वर्षानंतर प्रथमच जनता विद्यालय ह्या शाळेची ओढ माजी विद्यार्थ्यांना लागल्याची ही घटना आहे. १९९५ मध्ये इयत्ता १० वी वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. तब्बल ३० वर्षांनी या वर्गातील सर्व मुले मुली एकमेकांना भेटले. आठवणी सांगत सर्वांनी एकमेकांशी आपले सुख दुःख आणि प्रगतीच्या गप्पा रंगवल्या. यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षेबरोबर पूरक ज्ञान मिळत होते. मात्र सध्याचे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहे. शाळेत सर्व शालेय साहित्य मोफत आणि विद्वान गुरुजन शिकवण्यासाठी असूनही पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जास्त पहायला मिळतो अशी खंत सर्वांनी व्यक्त केली. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या आठवणी जागवल्या. मनोगत व्यक्त करतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. सर्व आठवणींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

error: Content is protected !!