
इगतपुरीनामा न्यूज – पावसाच्या माहेरघरीच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. इगतपुरी शहरातील सर्वच भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. आठवड्यातून तीनच दिवस शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचे पाणी कमी झाल्याने येणारे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही असा तपासणीचा अहवाल आला आहे. तरीही हेच पाणी फिल्टर न करता पाणी पुरवठा केला जात असल्याने आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात इगतपुरीकरांनी एकजुट करून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. इगतपुरी शहराला २४ तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून गेल्या सात आठ वर्षापूर्वी भावली धरणातुन इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ३६ कोटी रुपयांची योजना मंजुर करण्यात आली होती. नळ पाणीपुरवठा योजना कामाची मुदत दोन वर्षाची होती मात्र अद्यापही ही योजना पुर्ण झालेली नाही. केवळ ४० ते ५० टक्के काम झाले असून संबधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला देखील दिला आहे. यामुळे या नळ पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आरोग्य विभागाचे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, जागरूक नागरिक कृती समिती, जेष्ठ नागरिक, जनसेवा प्रतिष्ठान, महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. शहरातील अनियमित व दूषित पाणीपुरवठा, कचरा समस्या, नाले सफाई, शहरातील रस्त्याची दुरवस्था या संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान भेटीसाठी आलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ आढाव यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला आला. महाराष्ट्र दिनी १ मे पर्यंत समस्यांचे निराकरण न झाल्यास १ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. एक तासाच्या खडाजंगी नंतर मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने १ मे पर्यंत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिणीस योगेश चांदवडकर, किरण फलटणकर, आर. जी. परदेशी, पूरणचंद लुणावत, अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दि. ना. उघाडे, रमेशसिंग परदेशी, गौरव गायकवाड़, सज्जन शर्मा, अजित पारख, सोमनाथ भुतडा, विजय खवळे, रोहन दगडे, वैशाली आडके, चारुलता ठाकूर, अंजूताई पराडे, रामचंद्र नायर, अजित पारख, डॉ. प्रदीप बागल, गजानन गोफणे, किसन परदेशी, उमाशंकर परदेशी, मंगेश भराडे, ट्रीझा रणधीर यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.