लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
इगतपुरी तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीचा मुद्ध्येसुद अभ्यास, पोटतिडकीने प्रश्न मांडण्याची हातोटी, जनसंपर्काचा प्रचंड फैलावलेला वटवृक्ष आणि कोणतंही काम पूर्ण होईपर्यंत स्वतःला बांधून घेणारं लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग त्र्यंबकराव वारुंगसे. राजकारणात सक्रिय असूनही राजकारणातील दूषित फळांपासून अलिप्त राहून जनसामान्य लोकांना आश्वस्त करून शेकडो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत. पंढरीच्या पांडुरंगाला प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणे शक्य होते की नाही हे माहीत नाही मात्र हा “पांडुरंग” जनसेवेसाठी कायमच “कटिबद्ध” राहत आहे.
सुसंस्कारित कुटुंबात जन्म घेऊन अध्यात्म आणि सेवेचे बाळकडू मिळायला भाग्य लागतं. अशाच शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परम परमात्मा पंढरीश पांडुरंगाचे नाव ह्या मुलाच्या निमित्ताने आपल्या मुखात यावे म्हणून आईवडिलांनी त्यांचे नाव “पांडुरंग” ठेवले. स्वतःच्या मुखात नाम यावे म्हणून नाव ठेवलेले असले तरी सर्वच लोकांच्या मुखात त्यांच्या निमित्ताने कायमच “पांडुरंग” नामोच्चार झाल्याशिवाय राहत नाही.
शिक्षण आणि सुसंस्कृत संस्कार घेऊन पांडुरंग वारुंगसे यांनी जनतेतील परमेश्वराची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण ह्याची सांगड घातली. यासोबत तत्कालीन काळात सुप्रसिद्ध असणाऱ्या दै. गांवकरी वृत्तपत्रांतून परिणामकारकपणे लोकांचे मूलभूत प्रश्न मांडले. त्यांच्या रोखठोक लेखणीमुळे प्रशासनाला ते प्रश्न सोडवावे लागत. बहरत असलेले त्यांचे नेतृत्व एक एक यशाची शिखरे गाठत होते. त्यानुसार इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद मिळवून त्यांनी गावात विकासाचा धडाका लावलेला होता. त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे प्रस्थापितांना त्यांची दखल घ्यावी लागली. महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी ते निवडून आलेच पण मानाचे उपसभापतीपद सुद्धा त्यांनी भूषवले. त्यांच्या जनसेवेला वाहून घेण्याच्या कार्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून ऐतिहासिक विजय पटकावला. एवढेच नाही तर पंचायत समितीमध्ये उपसभापती पदावर कारकिर्दीत केलेलं कार्य आजही लोकांच्या चांगले आठवणीत आहे. पक्षीय पातळीवर सुद्धा त्यांनी विविध पदे भूषवली.
बहुचर्चित समृद्धी महामार्ग बाधितांच्या संघर्ष युद्धात सुद्धा त्यांनी अभूतपूर्व काम केले. परिणामी शासनाला बाधितांची दखल घेऊन मोठी भरपाई द्यावी लागली. मागे वळून पाहतांना आजही त्यांच्या समाजसेवेचा वसा अखंडपणे सुरू आहे. राजकारण करताना सर्वसमावेशक मार्गाने विकासाची घोडदौड करण्यासाठी त्यांचा हातखंडा आहे. लिखाणाला जागा कमी पडेल एवढं त्यांचं मोठं काम आहे, जे इथं मांडण्यात अशक्य आहे.
अशा निर्लोभी, प्रामाणिक, रोखठोक, अभ्यासू, दिलदार आणि नागरिकांच्या सुखदुःखातील नेहमीचे सोबती पांडुरंग वारुंगसे यांचा आज जन्मदिवस.. यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्यासाठी इगतपुरी तालुक्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा..!