
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात असणाऱ्या हॉटेल दिपाली येथे धारदार शस्त्रे घेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घोटी पोलिसांनी तुषार धनंजय भोसले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून कसून तपास सुरु केला आहे. या घटनेतील गंभीर जखमीवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. संशयित आरोपी ऋषिकेश शिवाजी पदमेरे रा. उभाडे, ओमकार भोसले, सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत, दिपक बनसोडे, सचिन घाणे व त्यांचे ३/४ साथीदार ( नाव गाव माहीत नाही ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की २४ मार्चला आरोपी ऋषिकेश पदमेरे हा फिर्यादी तुषार भोसले यांच्या दिपाली हॉटेलवर आला होता. यावेळी फिर्यादीचे वडील धनंजय भोसले यांनी ऋषिकेशला तु परत आमच्या हॉटेलवर येवु नको असे सांगितले. आरोपी ऋषिकेश पदमेरे याला या बोलण्याचा राग आला. त्याने गैरकायद्याची मंडळी जमवुन हातात लोखंडी चॉपर, धारदार हत्यारे, दांडके घेवुन फिर्यादी व साक्षीदार ऋषीकेश धनंजय भोसले यांना मारहाण केली. सर्वांना गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यासह हॉटेल समोरील वाहनाचेही नुकसान केले. घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच ते घटनास्थळी पोहोचले. तुषार भोसले यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून कसून तपासकार्य सुरु करण्यात आले आहे.