शेअर्समध्ये जास्त फायद्याच्या नावाखाली २७ लाख ७५ हजारांना घातला गंडा : इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली व्हॉटसॲप आणि मोबाईल कॉलद्वारे इगतपुरी येथील एकाला आणि त्याच्या कुटुंबियांना सायबर भामट्यांनी २७ लाख ७५ हजार ६०७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ क/ ड आणि भारतीय दंडविधान संहिता कलम ४२०, ४०९, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ मार्च ते १७ मे ह्या कालावधीत विविध मोबाईल नंबरच्या व्हॉटसॲपवरून कय्युम कसम खान वय ५८ रा. नगरपालिका रोड, उर्दू शाळेजवळ इगतपुरी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भामट्यांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. जास्त फायद्याची आकर्षक माहिती देऊन सर्वांचा विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खात्यावर वेळोवेळी रक्कम टाकण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कय्युम खान यांनी २७ लाख ७५ हजार ६०७ रुपयांची रक्कम त्यांच्यावर विश्वास ठेवून दिली. भामट्यांनी नामांकित गुंतवणूक कंपन्यांची नावे सांगून आणि गुंतवणूक एजन्सीची नावे सांगितल्याने विश्वास ठेवला गेला. मात्र या महिन्यात आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने कय्युम खान यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील भामट्यांचे मोबाईल नंबर, विविध बँक खाती आणि तथाकथित गुंतवणूक कंपन्या या अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!