मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी युवा नेते लकीभाऊ जाधव यांची विशेष बैठक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत झाली चर्चा 

इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि डीबीटी बाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष बैठकीत चर्चा केली. विधानभवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके, आमदार राजेश पाडवी आणि वसतीगृहातील विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. लकीभाऊ जाधव यांनी पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेबाबत राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून त्यावत सविस्तर चर्चा केली. त्यानुसात मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन लकीभाऊ जाधव यांना दिले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी डीबीटी मध्ये वाढ करावी किंवा पूर्वीप्रमाणे खानावळ पद्धत सुरू करावी, योजनेत महागाईच्या दृष्टीने वाढ करावी, ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यानाही लाभ द्यावा आदी मागण्यांचे निवेदन लकीभाऊ जाधव यांनी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांना दिले. 

निवेदनात राज्यातील फक्त ४० हजार विद्यार्थ्यांनाच लाभ मिळतो. अनेक विद्यार्थी वंचित राहत असल्याने जाचक अटी रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. ११ वी, १२ वीच्या विद्यार्थांना ही योजना लागू करावी. मागील शैक्षणिक वर्षासह ह्या वर्षात अनेक विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले पैसे द्यावे. शहरी व ग्रामीण भागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची संख्या वाढवावी. याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. TRTI द्वारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी राज्यात निवडलेली काही काही प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देत नाही. विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी येत असल्याने संबंधित खाजगी प्रशिक्षण केंद्राला दिलेली योजना बंद करून चांगल्या प्रशिक्षण केंद्रांची निवड करावी. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्याना अद्याप उपलब्ध न केलेला निधी मिळावा. १२ हजार ५०० रिक्त पदांची विशेष पदभरती करून सर्व विभागातील सर्वच रिक्त पदे भरावी. बोगस आदिवासींनी बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींची नोकर भरती करण्यासाठी न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी सीमा जगताप, ममता ववळी, जयश्री चौरे, हर्षदा नाईक, ललिता कुबर, रोहित शिंदे, किरण पावरा, सुमाश गावित, जीवन कामडे, जितेंद्र कामडे हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!