
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथे आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व समूहातील ४०० महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संस्था प्रकल्प अंतर्गत महिलांची जनजागृती करण्यात आली. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी महिलांना सायबर क्राईम संदर्भात दक्षता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी महिलांच्या मासिक पाळीतील समस्या, कॅन्सर व इतर आजार याबद्धल मार्गदर्शन केले. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत महिलांशी संवाद साधला. ॲड. दिपाली अहिरे यांनी कायदेविषयक माहिती, आपले हक्क व जबाबदारी दैनंदिन जीवनातील समस्या व त्यावर कशी मात करू शकतो यावर मार्गदर्शन केले. आपली कुटुंब व्यवस्था आणि त्यामध्ये समन्वय यावर इगतपुरी पंचायत समितीच्या छाया पाटील यांनी महिलांना माहिती दिली. केरळच्या कुटुंबश्री प्रकल्पाच्या लता मॅडम यांनी आपण आपल्या गावाचा विकास कसा करू शकतो. आपल्याला कोणत्या मागण्या आपण ग्रामपंचायतीकडे करता येतात यावर प्रकाश टाकला. ह्या कार्यक्रमासाठी तालुका संसाधन पर्सन मोनाली नाठे, लोकल रिसोर्स पर्सन भारती नाठे यांनी परिश्रम घेतले. महिला दिन कार्यक्रमासाठी गोंदे दुमाला येथील उडान व उमंग महिला ग्रामसंघाने सहकार्य केले.
