इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक आणि दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या यूथ फेस्टिव्हल मैदानावर ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत जागतिक कृषी महोत्सवाचव आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात विनामूल्य प्रवेश असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांनी केले आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. कृषी विभाग व इतर सलग्न विभागाच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय दालने, शेतकऱ्यांचा शेतमाल थेट शहरी ग्राहकांच्या घरात पोहचावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रिय शेतमाल विक्री, आधुनिक शेती औजारांचे प्रदर्शन, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादित केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध शेती पद्धती, प्रक्रिया उद्योग, महिला परिसंवाद, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन महोत्सवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती दर्शविणारे विविध खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विस्तारक, कृषी क्षेत्रातील नव उद्योजक यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जागतिक कृषी महोत्सवात शेतकरी, तज्ञ अभ्यासक, कृषी व्यवसायिक, कृषी साहित्यिक, कृषी प्रेमी, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.