माननीय आमदार खोसकर साहेब, थोडासा वेळ काढून अस्वली जानोरीच्या ४ वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाकडेही लक्ष द्या..!

इगतपुरीनामा न्यूज – लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारक्षेत्रात आणि महत्वाची राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंडओहोळ पुलाचे काम गेल्या ४ वर्षापासून रखडलेले आहे. सहनशिलतेची हद्द संपलेल्या ह्या कामामुळे या भागातील शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्यायेण्याचे भलतेच हाल सुरु आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील पुलांच्या नव्या कामाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी नुकतीच बैठक घेतली. ह्यानुसार अस्वली ओंडओहोळ पुलाच्या कामाबाबत हिरामण खोसकर यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. श्री. खोसकर यांना आमदारकीची दुसरी टर्म मिळवून देण्यासाठी ह्या परिसराचे मोठे योगदान असल्याने लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुकणे धरणाचे रोटेशन सुटल्यावर रखडलेल्या पुलाच्या कामामुळे ह्या रस्त्याचा संपर्क तुटत असल्याने नागरिक संतापलेले आहेत. मुकणे धरणातील आवर्तनामुळे बांधकाम विभागाने बनवलेल्या पुलाच्या कामावरील तात्पुरता रस्ता पाण्याने सतत धुवून जात असतो. नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख मार्गे दूरवरून लोकांना मार्गक्रमण करावे लागते. ह्या ओंडओहोळ नदीवरील पुलाचे काम जलदगतीने करावे अशी जुनी मागणी असून सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. अस्वली ते मुंढेगाव हा रस्ता नागरिकांसाठी महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरील पुलाचे काम इगतपुरीच्या सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ४ वर्ष झाली तरी कासवगतीने सुरू आहे. मुंढेगावकडे जातांना येतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या ह्या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे महत्वाचे आहे. या भागातील लोकांची सहनशक्ती ४ वर्षांपासून संपली असल्याने आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी आहे.

Similar Posts

error: Content is protected !!