इगतपुरी तालुक्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटात जोरदार गारपीट ; बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा : पांडुरंग वारुंगसे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2


इगतपुरी तालुक्यातील विविध भागांत आज सलग चौथ्या दिवशीही विजेच्या कडकडाटासह गारपीट आणि वादळी पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या अनेक हेक्टर जमिनीवरील पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जनावरांचा चारा, भाजीपाला पिके आणि कापणीवर आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. एकीकडे कोरोनाचे भयंकर संकट असतांना तग धरून असलेल्या शेतकरी बांधवांना निसर्ग जगू देत नसल्याचे विदारक चित्र आहे. अशा परिस्थितीत शासन सुद्धा लक्ष देत नसल्याने बळीराजा अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. महसूल यंत्रणेने कृषी विभागाच्या समन्वयाने तात्काळ पंचनामे करून क्षतीग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील बेलगांव तऱ्हाळे, टाकेद बुद्रुक, घोटी, इगतपुरी, वैतरणा, वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, साकुर, नांदगाव बुद्रुक, मुंढेगाव, सांजेगाव आदी परिसरातील सर्व गावांमध्ये आज जोरदार गारपीट झाली. वादळी वारा, विजेचा कडकडाट होऊन मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले. भाजीपाला, गहू आदींसह जनावरांचा साठवून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान झाले. कोरोनाचे संकट असल्याने आधीच बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे. त्यातमध्येच बेमोसमी पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. सलग चौथ्या दिवशीही प्रचंड नुकसान होऊनही शासन लक्ष देत नसल्याने शेतकरी बांधव संताप व्यक्त करीत आहेत.
शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके सपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना निसर्ग जगू देईना आणि सरकार सुद्धा लक्ष देईना असे शेतकरी बोलत आहेत. महसूल यंत्रणेने कृषी विभागाच्या समन्वयाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे. 

नांदूरवैद्य येथील पावसाची स्थिती