“मु. पो. मोडाळे” पुढील आठवढ्यात होणार कार्यान्वित : मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव गावांसाठी स्वतंत्र पोस्ट कार्यालय ; गोरख बोडके यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – नाशिक जिल्ह्यातील टॉप आणि वेगाने विकसित असणारे गाव मोडाळे येथे ह्या आठवड्यात स्वतंत्र पोस्ट कार्यालय सुरु होत आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचे मुख्य महाप्रबंधक गणेश साळवेशर यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना ही माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही दूरध्वनीवरून गोरख बोडके आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आता मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव या तिन्ही गावांचे पोस्ट मोडाळे येथे सुरु होणार असून सांजेगाव कार्यालयाशी आता ह्या गावांचा संबंध संपुष्टात आला आहे.अतिदुर्गम गाव, सभोवताली डोंगर दऱ्या, साधनांचा अभाव आणि जगाची कोणतीही खबर नसलेले गाव म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला.

शैक्षणिक पदव्या आणि उच्च शिक्षणामुळे युवकांना नोकऱ्यांच्या संधी पोस्टाच्या सेवेद्वारे मिळण्यासाठी ब्रिटिश काळातील सांजेगाव पोस्टाच्या संपर्कात राहावे लागत होते. आता जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या अविरत प्रयत्नांनी पुढील आठवड्यात मोडाळे गावात पोस्ट कार्यालय कार्यान्वित होणार आहे. मु. मोडाळे, पो. सांजेगाव याऐवजी आता मु. पो. मोडाळे अशी नवी आणि दिमाखदार ओळख निर्माण होणार आहे. यासह ग्रामस्थांना पोस्टाच्या विविध योजना, बँकिंग याचा लाभ होणार आहे. मोडाळे गावात स्वतंत्र पोस्ट निर्मित करावे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी विविध पातळ्यांवर यशस्वी पाठपुरावा केला म्हणून गावकऱ्यांनी त्यांचे आणि नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव, आयपीबीबीचे शाखा व्यवस्थापक श्री. दुबे, तक्रार निरीक्षक एम. आर. देवरे, उपविभागीय निरीक्षक पी. एस. सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!