आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने माहिती तंत्रज्ञान या अभ्यास घटकाविषयी अतिशय अपडेट राहिले पाहिजे. या विषयावर सखोल मार्गदर्शन करताहेत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी…!
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ माहिती तंत्रज्ञानाचे युग
आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान या अभ्यास घटकाविषयी अतिशय अपडेट राहिले पाहिजे. व्यवहारात तसेच आजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याचा वापर प्रत्येक व्यक्ती मोठ्या प्रमाणात करत असते. परंतु त्या तंत्रज्ञानाचा जनक कोण ?, ते तंत्रज्ञान आपल्याकडे केंव्हा आले ?, त्याची निर्मिती कोणी केली ? आदी प्रश्न विचारले तर मात्र त्याची उत्तरे आपल्याला देता येत नाहीत.
■ स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका
आज कोणत्याही स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका हातात घेतल्यावर आपल्याला माहिती तंत्रज्ञानावरील प्रश्न सापडतात. या प्रश्नांचे स्वरूप अतिशय सोपे असते। त्याचप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे सहज देता येण्यासारखी असतात। तेंव्हा उमेदवारांनी या घटकाबद्दल भीती बाळगू नये किंवा हा अभ्यासघटक खूप अवघड आहे असा समज अजिबात करून घेऊ नये. ICT म्हणजेच Information and Communication Technology होय. नेट आणि जेआरएफ परीक्षेचा नवा अभ्यासक्रम आला आणि त्यावर निघालेल्या प्रश्नपत्रिकेत ICT चे पूर्ण रूप ओळखा असा प्रश्न विचारला गेला. याप्रकारे सोपे प्रश्न असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
■ प्रश्न सोडवण्याची पद्धत
या अभ्यास घटकाची तयारी करताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांमधील या घटकावरील प्रश्न सोडविताना चारही पर्यायांचा परामर्श घ्यावा. उदाहरणार्थ ‘एज्युसॅट’ ( Edusat ) या शैक्षणिक उपग्रहाची निर्मिती कोणत्या संस्थेने केली ?
A. ISRO
B. CSIR
C. NASA
D. NDA
या प्रश्नाचे योग्य उत्तर ISRO हे होय. उमेदवारांनी या ठिकाणच्या चारही पर्यायांचा अभ्यास, विचार करावा. उदा. ISRO चे पूर्ण रूप ओळखणे Indian Space Research Organization. तसेच CSIR – Council of Scientific and Industrial Research. NASA- National Aeronautics and Space Administration ( USA ). NDA- National Defence Academy. या पद्धतीने अभ्यास केल्यास चार प्रश्नांचा अभ्यास होतो हे लक्षात घ्या। तसेच येथे एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पुढील प्रश्नपत्रिकेत NDA चे पूर्ण रूप ओळखा हा प्रश्न विचारला गेला होता. म्हणून विद्यार्थ्यांनी गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होता येते हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.
■ अभ्यासाइतकेच तंत्र महत्त्वाचे
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासाइतकेच Technic महत्त्वाचे होय. हे विसरता कामा नये. उदाहरणार्थ ‘पीडीएफ’ ( PDF ) या तंत्रज्ञानाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
A. चार्ल्स चक गेश्के
B. जोईल एंजेल्स
C. जे. एल. बेअर्ड
D. चेस्टर कार्लसन
येथे या प्रश्नाचे योग्य उत्तर चार्ल्स चक गेश्के हे होय. याठिकाणी विद्यार्थ्यांनी B, C, D या पर्यायांचा देखील विचार करावा. जसे : जोईल एंजेल्स यांनी मोबाईल फोनचा शोध लावला. जे. एल. बेअर्ड यांनी दूरदर्शनचा शोध लावला. चेस्टर कार्लसन यांनी झेरॉक्स मशिनचा शोध लावला. अशापद्धतीने अभ्यास झाल्यास एका प्रश्नाबरोबरच अनेक प्रश्नांची तयारी होते हे एक नवे तंत्र समजायला हरकत नाही.
■ अभ्यास सोपा करा
स्पर्धा परीक्षा म्हटली की खूप अभ्यास हे समीकरण मनातून काढून टाका. योग्य मार्गदर्शन, निश्चित ध्येय, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेचे स्वरूप, योग्य अभ्यास साहित्य ही पंचसूत्री वापरल्यास अभ्यास सोपा होतो. भीती नष्ट होते आणि ठरविलेले ध्येय गाठता येते. अवघड असे काहीच नाही हे मनाशी निश्चित करा यश तुमचेच आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )