
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने मायबाप मतदारांचे आशीर्वाद भरभरून मिळाले. लोकांचे खरे दुःख यानिमित्ताने समजून घेता आले. माझा आदिवासी आणि अन्य समाज बांधव ह्या प्रस्थापित राजकारण्यांनी अगदी गरिबीच्या खाईत नेवून टाकला आहे. माझ्या मायबहिणी अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासून दोन दोन किलोमीटर जातात. रस्ते खाऊन टाकल्याने शेतमाल वेळेत बाजारात जात नाही, वाहने नादुरुस्त झालीत. बेरोजगार युवक रोजगारासाठी सैरभैर झालेत. अर्धवट शिक्षणामुळे युवा पिढी भरकटली आहे. आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेली ठराविक लोकं गब्बर झालीत. यांच्याकडे महागड्या गाड्या, अंगावर सोन्याची लगड, स्वतःचे हॉटेल, फार्महाऊस आणि सोबत डॉन मंडळीचा वावर दिसून येतो. ही माणसं शेतीत कष्ट करतात का? सामान्य माणसाच्या टाळूवरचे लोणी खात खात ही प्रवृत्ती दिवसेंदिवस बलाढ्य अन धनाढ्य झालीत. कोणी यांना मोठं केलं? एवढी श्रीमंती आली कुठून? ह्या जोरावर हे लोकं सामान्य माणसाला पायताण समजायला लागलेत. कोरड्या भातात लाल मिर्ची कालवून आणि भाकरी बरोबर कांदा फोडून खाणाऱ्या झोपडीतल्या कुटुंबातला मी मुलगा आहे. ही गरिबीची परिस्थिती मी सोसली आहे, सोसत आहे. गरिबाच्या कल्याणासाठी आलेला पैसा गडप करण्यात आलेला आहे. हाच पैसा विधानसभेच्या निवडणुकीत धरणातील मुंबईला जाणाऱ्या वेगवान पाण्यासारखा खर्च होतोय. का? पुन्हा पुढची पाच वर्ष दुप्पट टिप्पट वसुली करण्यासाठीच ना? लोकांचे कल्याण करायला आलेला करोडो रुपयांचा निधी होताच ना? मग कुठं गेले कल्याण? आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या छाताडावर बसून पुन्हा पुन्हा विधानसभेत जाण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. लाखो आदिवासी आणि सामान्य माणसांचे शिव्या शाप तुमच्या मागे लागलेत. आणि माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला विधानसभेत पाठवण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद द्यायला सज्ज झालेत. प्रस्थापितांनो, तुमच्या राज्यसत्तेच्या पायाखाली तुम्ही चिरडून टाकलेली जनता तुम्हाला २० तारखेला होणाऱ्या मतदानात पंजाचे बटण दाबून कायमचा धडा शिकवणार आहे. अशा तिखट, आक्रमक आणि गंभीर शब्दांत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी वाडीवऱ्हे गटाच्या प्रचारदौऱ्यावेळी मोकळ्या वेळेत ‘इगतपुरीनामा’ प्रतिनिधीशी संवाद साधला. वंचित, पीडित, गरीब, कष्टकरी, श्रमजीवी, रंजलेले, गांजलेले आणि विकासापासून कोसो दूर असणारे खेडेपाडे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात आहेत. मतदारसंघाला वर्षानुवर्षे अप्रगत ठेवणारे तीनही माजी आमदार लोकांकडे मतदान मागत आहेत. सामान्य नागरिकांनो, त्यांना विचारा तुमच्या आमदारकीच्या कारकिर्दीत तुम्ही काय दिवे लावले? कोणाचा विकास केला? पुन्हा दारिद्र्याच्या खाईत लोटायला आला आहात का? ह्या सर्वांना तुम्ही आमदारकीची संधी देऊनही त्यांनी दरिद्री मतदारसंघ करून ठेवला. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याची लकीभाऊ जाधवची गॅरंटी आहे. येत्या २० तारखेला सर्व विरोधकांना घरी बसवण्यासाठी अ. नं. ४ समोरील पंजा चिन्हाच्या समोरील बटण दाबून मतदारराजा मला निवडून देतील हा मला आत्मविश्वास असल्याचे लकीभाऊ जाधव यांनी शेवटी सांगितले.