भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – हिरामण खोसकर हे आदिवासी समाजातील अत्यंत मेहनती आणि प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकासासाठी ३ हजार ३०० कोटी रुपयांची विकासकामे त्यांनी आणली. आगामी काळात ह्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबककरांनी घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबून हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवावे. घोटी, हरसूल येथे आधुनिक रुग्णालय, छोट्या निर्मिती, रोजगार निर्मिती आणि खरा विकास कारण्यासाठी हिरा असलेल्या माणसाला म्हणजे हिरामण खोसकर यांना मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी घोटी येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झालेल्या ह्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केले. कार्यक्रमासाठी दोन्हीही तालुक्यातील असंख्य महिला आणि पुरुष नागरिक हजर होते. महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लाडकी बहीण योजना अतिशय व्यापक स्वरूपात राबवत असून लाडक्या बहिणी समाधानी आहेत. शेतकरी बांधवांना शून्य वीजबिल असल्याने उत्पादन आणि उत्पनात वाढ होणार आहे. आगामी काळात महायुतीचे सरकार येणार असल्याने इगतपुरी मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी हिरामण खोसकर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी ह्या मतदारसंघाने येत्या २० तारखेला घड्याळ चिन्ह पाहून मतदान करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी हिरामण खोसकर यांनी आपल्या मनोगतात विकासाच्या कामांचा आढावा घेतला. विरोधी उमेदवार करीत असलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. विक्रमी जाहीर सभेत महायुतीच्या विविध राजकीय पक्षाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी घोषणाबाजी करून जल्लोष केला. सभेपूर्वी इगतपुरी महिंद्रा कंपनी ते बोरटेंभे, सिन्नर फाटा घोटी ते सभेचे स्थळ अशी विराट रॅली काढण्यात आली. ह्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.