अद्वितीय व्यक्तिमत्व सोमनाथ तेलोरे ह्या अष्टपैलू शिक्षकाची अखेर

– अनिल बागुल, जिल्हा सल्लागार
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, नाशिक
पदवीधर शिक्षक, मुंढेगांव, ता. इगतपुरी

30 एप्रिल 2021. रात्री अकराची वेळ. डिस्चार्ज मोबाईल चार्जिगला लावून बाहेर गेलो होतो. घरी आलो तर पत्नी म्हणाली तुमचा फोन लागत नाही. बरेच फोन आले. सपकाळे सर, बोढारे अण्णा, द. ल. वाणी, नरेंद्र सोनवणे यांनी शेवटी माझ्या फोनवर संपर्क केला. मित्रांनी इतक्या तत्परतेने रात्री फोन केला म्हटल्यावर काही झाले तर नाही ना या विचाराने घाबरलोच. अण्णांना लगबगीने फोन केला तर धक्काच बसला. मन विषन्न करणारी घटना घडली. सोमनाथ तेलोरे सर अचानक आपणास सोडून गेले. एक दिलदार, सदाबहार कलाकार, कर्तुत्ववान शिक्षक, अभ्यासू नेता, सच्चा मित्र, कनवाळू समाजसेवक अकाली सोडून गेला.
सिन्नरला बदली करून गेले तरी सतत आमचा फोनवर संपर्क असायचा. खरे तर त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने एक चांगला मित्र मिळाल्याचा आनंद झाला होता. मंगलपरिणय ग्रुपवरून परस्पर दोन कुटुबांचे बायोडाटा घेऊन एक लग्न आम्ही परस्पर जोडले होते. असेच एके दिवशी फोन करून राजेंद्र म्हसदे सरांच्या प्रकृतीची चौकशी करून म्हणाले होते. आबा, काहीही करा पण नेत्याला काही होऊ देऊ नका. शर्तीचे प्रयत्न करूनही करूनही नेत्याला वाचवता आले नाही. तेव्हा अतिशय खिन्नतेने फोन करून म्हणाले, वाघासारखा धिप्पाड माणूस, कोणालाही न घाबरणारा हा माणूस असा कसा गेला ? माझा विश्वासच बसत नाही आणि आता स्वतःच … : … हे काय केलेत सर ? त्यांच्या सहवासाच्या आठवणींनी जीव व्याकूळ होत असतांनाच आज पुन्हा एकदा !!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संघटनेत शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत लढणारा धुरंधर नेता म्हणून तेलोरे सर सर्वांना परिचित होते. बदलीने तालुक्यात कुरुंगवाडीला आले. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडचे डी. डी. गोर्डे सर यांच्या सुर्यपुत्र संभाजी या नाटकातील अजरामर भूमिकेमुळे त्यांना ओळखायचो. परंतु इगतपुरीतील सहवासात त्यांच्या बहुविध पैलूंचा अनुभव आला. कुरुंगवाडी हवं सह्याद्री पर्वत रांगेवरीलअसे गाव की जेथे सर्वाधिक पाऊस. १०० % आदिवासी बहुल व वाहतुकीची साधने नसलेले गाव. स्वताहून कुणीही जायला तयार होत नव्हते. सरांनी त्या गावात अक्षरशः नंदनवन फुलवले.
मला आठवते जून जुलै महिना असेल. कुरुंगवाडीला रुजु झाल्याबरोबर राजाभाऊ वाजे व सिन्नरचे व्यावसायिक चांडकशेठ यांच्या मदतीने कुरुंगवाडीच्या विकास कामाचा प्रारंभ केला. मुसळधार पावसात एका मोकळ्या शेडखाली हा कार्यकम झाला. त्यानंतर तेथील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यापासून साबण तेलापर्यंत सर्व काही सर मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत. ते स्वतः मुलांची कटींग करून देत. आपल्या सहशिक्षकांना बरोबर घेऊन कुरुंगवाडीच्या भोवतालच्या दऱ्याखोऱ्यात पायपिट करून विद्यार्थी जमा करत. यामूळे मात्र ५५ पटसंख्या असलेली ही चौथ्या वर्गापर्यंतची ही द्विशिक्षकी शाळा आठवीपर्यंतची शाळा झाली. पटसंख्या 200 पेक्षा जास्त झाली. पुन्हा एम्पथी फाऊंडेशनच्या मुंबईच्या मदतीने लाखो रुपयांची मदत मिळवून दिमाखदार शाळा बांधून घेतली. सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज शाळेत गरिबांची मुले आनंदाने शिक्षण घेऊ लागली. विद्यार्थ्यांबरोबर गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाईपलाईनसह पाण्याच्या टाकीचीही व्यवस्था केली. रविंद्र चाचेच्या फॅन्ड्री फाऊंडेशनच्या माध्यमातून सिद्धार्थ सपकाळेंच्या साथीने 1000 जांभळीची झाडे लावून जांभूळ वन तयार करून शाळा राज्यभरात नावारुपाला आणली.
अतिशय प्रेमळ व उपक्रमाशिल शिक्षक म्हणून गावात व शिक्षक व अधिकाऱ्यात ते लोकप्रिय झाले. दिवाळीच्या सणात एक करंजी मोलाची, नवीन कपडे मिळवून देणे यासारखे उपक्रम राबवत गोरगरीब लोकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी ते सतत धडपड करीत. सिन्नर तालुक्यात बदली झाली तरी तेलोरे सर अधुनमधुन कुरुंगवाडीला येत असत. त्यावेळेस सगळा गाव त्यांना भेटण्या साठीआपुलकीने जमा व्हायचा.
बदली झाल्यानंतर निरोप सभारंभाला मी उपस्थित होतो. गाव सोडताना विद्यार्थी, सहशिक्षक व गावकऱ्यांच्या भावना दाटून आलेल्या मी पाहिल्या. गावाबरोबर त्यांनी कुटुंबातील सदस्याचे नाते तयार केले होते. आपली शाळा, गावाबरोबरच इतर शाळांना मदत मिळवून देण्यासाठीही सर सतत धडपड करीत. रोजगार मिळावा म्हणून बकऱ्या, गावरान कोंबड्या पालन व्यवसाय सुरु करून देण्यातही सरांनी मोलाचे सहकार्य केले.
सरांकडे उतम नेतृत्व कौशल्य होते. शिक्षक संघात तालुका अध्यक्ष ते राज्य उपाध्यक्ष पदावर काम करताना अतिशय भरीव काम केले. संघटनेचे राज्य नेते अंबादास वाजे त्याचबरोबर भोर सरांचे ते खास मित्र होते. त्यांच्या सोबतीने शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यात मोलाचा वाटा होता.
तेलोरे सर म्हणजे माणुसकीचां वाहता झरा. सिन्नरमार्गे पुण्याला जातांना व येतांना सरांची आठवण यायची. फोन व्हायचे . सर सतत पायात भिंगरी घातल्याप्रमाणे फिरत. सामाजिक कामात सतत व्यस्त असत. तरीही जेवण करून जा असा आग्रह सतत असायचा. जातीवंत कलाकार, चाणाक्ष वक्ता, उतम व कार्यकुशल उपक्रमशिल शिक्षक, लढवय्या नेता, माणुकीचा दिलदार मित्र हृदयात मात्र कायमची जागा करून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली…!                    

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    भास्कर गुंजाळ says:

    सोमनाथ तेलोरे सरांचा कुरुंगवाडी येथे असताना सहवास लाभला. कोणत्याही कार्यक्रमास आवर्जुन आमंत्रण देऊन यथोचित मानसन्मान द्यायचे.

    भावपुर्ण श्रद्धांजली

  2. avatar
    Amol says:

    एक चांगला जिगरबाज माणूस गमावला .सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

error: Content is protected !!