ठरलं..! लकीभाऊ जाधव देणार इंदिरा काँग्रेसतर्फे लढत ; इगतपुरी मतदारसंघात लढा झाला तीव्र

इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवानेते तथा उमदे नेतृत्व लकीभाऊ भिका जाधव यांना इंदिरा काँग्रेसने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. २०१९ ला त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली मात्र त्यावेळी त्यांना जवळपास १० हजार मते मिळून ते पराभूत झाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासाठी इगतपुरी मतदारसंघ दिलेला असल्याने त्यांना आज काँग्रेसची उमेदवारी घोषित झाली. मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी ते सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते.  यांच्या उमेदवारीने इच्छुकांची भूमिका बदलली जाईल अशी शक्यता आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि लकीभाऊ जाधव यांच्यात यावेळी प्रमुख लढत होणार असून इतर पक्षाचे उमेदवार सुद्धा लढत देत आहेत. 

इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात इंदिरा काँग्रेस पक्षाने उमेदवारी कोणाला द्यायची ह्याचे घोंगडे भिजत ठेवले होते. महायुतीने विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना संधी देऊन मैदानात उतरवले आहे. त्यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी काँग्रेसने युवानेते लकीभाऊ जाधव यांना आज तिकीट घोषित केले. हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात राखण्यासाठी लकीभाऊ जाधव ह्या सरसावले आहेत. उबाठा शिवसेना, इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मित्रपक्षांची उमेदवारी लकीभाऊ करणार आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी आनंद व्यक्त केला. लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी प्रचाराचे परिणामकारक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्यासाठी लकीभाऊ जाधव यांनी सूक्ष्म नियोजन केल्याचे दिसून येते आहे. पक्षाचा आदेश, कार्यकर्त्यांचा सततचा आग्रह, संथ विकासाला गतिमानतेचे स्वरूप आणि मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी उमेदवारी करून विजयी होईल असे त्यांनी म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!