इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करतांना आदिवासी नागरिकांना सन्मान वाटेल असे काम इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे झाले आहे. मोडाळे येथील आदिवासी वस्तीचे नामकरण महान क्रांतिकारक राघोजी भांगरे वस्ती असे करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवून नामकरण करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. गोरख बोडके यांच्याकडून जिल्हा परिषद 15 वित्त आयोग निधीतून पाणीपुरवठा नव्याने करण्यासाठी पाईपलाईन आणि आमदार नरेंद दराडे यांच्या निधीतून सभामंडप सुद्धा करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. ह्या विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात 100 उपयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. राघोजी भांगरे यांचे नाव आदिवासी वस्तीला देऊन विविध विकासकामांचा शुभारंभ झाल्याने आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.