इगतपुरीनामा न्यूज – आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस दल अवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करीत येत आहे. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील हॉटेल सार्थक नाश्ता पॉईंट याठिकाणी सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी हा देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगुन फिरत असल्याची खात्रीशीर बातमी स्थागुशाचे पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाळत ठेवुन सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी, वय २०, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी यास ताब्यात घेतले. त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले, हा आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे. त्याच्या विरूध्द वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी याच्यावर यापुर्वी खुन, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, दुखापत यासारखे गंभीर ९ गुन्हे दाखल आहे.
सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार तलवार कब्जात बाळगल्या प्रकरणी इसम नितेश किसन बिन्नर, वय २३, रा. एकता नगर, ता. सिन्नर याचेविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ व २४ ऑक्टोबर २०२४ रोजी नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीत देशी विदेशी मद्याची विकी व वाहतुक तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणारे एकुण ३० इसमांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात देशी विदेशी मद्य व हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य सामुग्री असा एकुण २ लाख ९ हजार ८६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहुन निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे सत्वर कारवाई करीत आहे.