भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने २ दिवसापूर्वी पक्षात आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीचे नाराज इच्छुक बाळासाहेब शिवराम झोले यांनी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीने भाऊराव डगळे यांना तिकीट दिले. चुरशीच्या लढतीतील प्रमुख असणाऱ्या इंदिरा काँग्रेसचा उमेदवार कोण हे याक्षणी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही कोणाला उमेदवारी बहाल करायची यासाठी थांबलेली दिसते. शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ अजूनही उमेदवारीसाठी आशादायी आहेत. राजकीय परिस्थिती, ठाकूर समाजाच्या भावना अन कोण कोण उमेदवार आदी सर्वांगीण विचार करून काशिनाथ मेंगाळ उमेदवारीचा निर्णय घेणार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असणाऱ्या काँग्रेस पक्षात उमेदवारी न मिळाल्यास काहीजण बंडाचा झेंडा हाती घेऊन उमेदवारी करणार असल्याचे संकेत आहेत. माजी आमदार निर्मला गावित यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट दिले जाईल अशी शक्यता दिसते तर खरी मात्र यावर अद्याप काहीही निर्णय नसल्याने सर्वांची संभ्रमावस्था आहे. इगतपुरीचा आमदार कोण होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, त्यांचा ठाकूर समाज, हितचिंतकांची भूमिका, काँग्रेस आणि मनसेची उमेदवारी कोणाला मिळणार अन त्यानुसार होणाऱ्या संभाव्य बंडखोऱ्या यावरच इगतपुरीचा आमदार कोण हे निश्चित होणार आहे.
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील इगतपुरी तालुक्यात ७७ हजार ७१३ पुरुष, ७५ हजार १३४ महिला, इतर ४ असे एकूण १ लाख ५२ हजार ८५१ मतदार आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ हजार ५७ पुरुष, ६१ हजार ९६७ महिला, इतर १ असे एकूण १ लाख २७ हजार २५ मतदार आहेत. दोन्हीही तालुके मिळून २ लाख ७९ हजार ८७६ मतदार इगतपुरी विधानसभेतील २०२४ चा आमदार कोण हे ठरवणार आहेत. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाची असल्याने माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी होती. मात्र खोसकर यांना उमेदवारी बहाल केली गेली. आताही माजी आमदार मेंगाळ हे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. ७० हजारापेक्षा जास्त असणारा त्यांचा आदिवासी ठाकूर समाज, मराठा आणि अन्य आदिवासी समाजाचे मतदार पाहता मेंगाळ यांची भूमिका आमदार कोण होईल यासाठी अतिशय मोलाची असणार आहे. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्याचाही मोठा परिणाम अंतिम निकालात दिसून येईल. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. काँग्रेस पक्षाला ही जागा असल्याने यांचा उमेदवार कोण यावर अनेक घडामोडी अवलंबून आहेत. या पक्षातील इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता बरेच जण बंडखोरी करून उमेदवारी करतील असा कयास आहे. त्यापैकीच एखाद्याला मनसेतर्फे तिकीट दिले जाईल असाही अंदाज आहे. इगतपुरी विधानसभेची यंदाची निवडणूक रंगतदार अन चुरशीची होणार असून बहुरंगी की पंचरंगी होईल हे काही दिवसात समजेल. तथापि इगतपुरीचा यावेळी आमदार कोण होणार हे निश्चित होण्यासाठी सुरु असलेल्या आणि सुरु होणाऱ्या घडामोठी मोठ्या परिणामकारक ठरतील.