इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान कॅच द रेन उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध विभागाने केलेल्या कामांचा लेखाजोखा घेण्यासाठी उद्या ( दि. २८ ) केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन बैठकांद्वारे नदी नाल्यांच्या खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामाची पाहणीही केंद्रीय पथक करणार आहे अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली. जलशक्ती अभियान कॅच दि रेन या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नाशिक जिल्हा दौऱ्याकरिता २८ जूनला दाखल होत आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभागाचे संचालक स्मिता श्रीवास्तव व पुणे येथील केंद्रीय जल, ऊर्जा व संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सुरबजित सिंह या दोन तज्ञ सदस्यांचे केंद्रीय पथक जिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियाना अंर्तगत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत.
काय आहे जलशक्ती अभियान
जलशक्ती अभियान कॅच द रेन ही एक कालबध्द मोहीम असुन २९ मार्च २०२२ ते २० सप्टेबर २०२२ असा या अभियानाचा कालावधी असुन जलशक्ती अभियान हे प्रामुख्याने पाच घटकावर आधारीत आहे.
१) जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण
२) पारंपरिक आणि इतर जलस्तोत्र तसेच मुख्य जलसाठ्याचे नुतनीकरण
३) जल संरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण
४) पाणलोट क्षेत्र विकास करणे
५ ) संघन वनीकरण