
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिग्गज पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मूळचे काँग्रेसचे पण शिक्षक मतदारसंघात शिवसेना उबाठाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, जनार्दन माळी, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, इगतपुरीचे माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पांडुरंग शिंदे, नाशिक बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, घोटी बाजार समितीचे उपसभापती संपत वाजे, संचालक दिलीप चौधरी, खरेदी विक्री संघाचे जयराम धांडे, प्रशांत कडू, संजय खातळे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम आदींनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सर्वांचा नामोल्लेख करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनीही सर्वांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी आमचा पक्षाची ताकद वाढल्याची भावना व्यक्त करून आगामी काळात यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात पक्षांतर होणारी ही सर्वात मोठी घटना आहे. याचा दुरगामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. महायुतीमध्ये घटक पक्ष असणारा शिवसेना शिंदे गट ह्या जागेसाठी पहिल्या क्रमांकावर आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आणि त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष रवींद्र भोये शिवसेनेकडून तिकिटासाठी इच्छुक आहे. अशातच आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने ही जागा नेमकी कोणाला सुटते याकडे लोकांचे सूक्ष्म लक्ष असणार आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अत्यंत प्रबळ पक्ष ठरणार असल्याचे आजच्या पक्षप्रवेशातून दिसून येते. हिरामण खोसकर यांच्या पक्षांतरामुळे आदिवासी युवा नेते लकीभाऊ जाधव यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळण्याचा मार्गही सोपा झाला आहे.