इगतपुरीनामा न्यूज दि. २६ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोशिरे तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माता पालक व पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष, सदस्य, न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक साळवे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लांडगे, पर्यवेक्षक परदेशी, श्रीमती पाटील आदी उपस्थित होते. विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी शाळेमध्ये करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत, ध्वजगीत, भारत स्काऊट गाईड प्रार्थना, स्काऊट गाईड ध्वजगीत विद्यालयातील संगीतशिक्षक शेवाळे यांच्या गीतमंचाने सादर केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी “प्रिय अमुचा भारत देश ” हे राष्ट्रभक्तीपर समूहगीत उत्साहात सादर केले. विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य व राजस्थानी नृत्य सादर केले. उपस्थित पाहुण्यांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लांडगे यांनी केले.
या प्रसंगी स्काऊट पथकाने संचलन सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी लेझीमनृत्य सादर केले. फलकलेखन कला शिक्षिका श्रीमती बोनाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती शिंदे यांनी केले.कार्यक्रमास स्कूलकमिटीचे अध्यक्ष, सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, मातापालक शिक्षक संघाचे सदस्य, पालक शिक्षक संघाचे सदस्य, हितचिंतक, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.