इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात आमदार होण्यासाठी बरेच लोक गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या रोजच वाढते आहे. युती आणि आघाडीधर्म पालन न करता प्रत्येकजण आपणच ह्या मतदारसंघांचे तारणहार आहोत असा आविर्भाव दाखवत आहे. पण ज्या मतदार राजाच्या भरवश्यावर हे सगळं चाललंय त्या मतदारांसाठी नेमकं काय करणार आहोत? याचा खुलासा कोणीच करायला तयार नाही. सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या शुभेच्छा देणारे बॅनर टाकून आपणच लोकांसाठी सेवा करणार असल्याचे सांगितले जात असले तरी मागील पाच वर्ष ह्या उमेदवारांनी काय काय कार्य केलं हे मात्र लोकांच्या चांगलं लक्षात आहे. गावागावात ग्रामपंचायत निवडणूकीत पडलेल्या रिकामटेकड्या लोकांनी इच्छुक व्यक्तींच्या प्रचाराची धुरा हातात घेतली आहे. प्रसिद्धी माध्यमातील नवखे प्रतिनिधी जणू काही आम्हीच हा मतदारसंघ जिंकून देऊ अशी आखणी करीत इच्छुकांना चुना लावतांना लोकांना दिसताहेत. इगतपुरी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी युती आणि आघाडी सक्रिय असली तरी इच्छुकांचा पोरकटपणा मनोरंजनाचा विषय ठरला आहे.
इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांमध्ये इच्छुकांचा मोठा भरणा आहे. तालुका जिल्हा पदाधिकारी उमेदवारांच्या सुळसुळाटामुळे त्रस्त आहेत. प्रदेश नेत्यांच्या दारात रोजच कोणीना कोणी इच्छुक भेट देत असल्याने तेही लोक आश्वासने देऊन देऊन मेटाकुटीला आले आहेत. सोशल मीडियावर उमेदवारांच्या पोस्ट पाहून जाणकार मतदार पुरेपूर वैतागले आहेत. असे असले तरी इच्छुकांची संख्या मात्र वाढतेच आहे. निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणाला होऊ शकते म्हणून सर्वच उमेदवारांना पहिल्या यादीत उमेदवारी घोषित होण्याची आशा आहे. यासाठी प्रसिद्धी यंत्रणा, सोशल मीडिया, बॅनरबाजीला जोर आला आहे. आपणच उमेदवारी मिळवणार आणि जिंकणार असल्याचा बादशाही थाट दिसून येतो आहे. यामध्ये लोकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अन्य पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी लॉबींग सुरु आहे. पक्ष निष्ठा, प्रामाणिकपणा उलथून टाकण्यासाठी इच्छुक व्यक्तींमधून आखणी करण्यात आली आहे. उमेदवारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीत ‘पडेल’ व्यक्ती पुढे पुढे करत आहेत. प्रसिद्धीचा आव आणून काही प्रतिनिधी खिसा भरून घेताहेत. शेवटी प्रदेश पातळीवरील नेतृत्व करणारे व्यक्ती उमेदवार निश्चित करणार असल्याने बऱ्याच इच्छुकांची झोप मात्र उडाली आहे हे नक्की….!