
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटन आणि पोहण्यासाठी आलेला एक २४ वर्षीय युवक बुडाला आहे. अतिक नाशिर खान असे त्याचे नाव असून त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणाच्या ओवर फ्लोमध्ये बुडाला. इगतपुरी पोलिसांना माहिती समजताच पथकाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरु केले होते. आज त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. मंगळवारी सकाळी अतिक नाशिर खान रा. आशीर्वाद कॉलनी, एस. व्ही. पी. म्हाडा वर्सोवा, मुंबई हा त्याच्या तीन मित्रांसोबत इगतपुरी तालुक्यातील भावली धरण येथे पोहण्यासाठी आला होता. भावली धरणाजवळील ओव्हर फ्लोच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी इगतपुरी पोलिसांना दिली होती. स्थानिक पानबुड्या व्यक्तींकडून शोध कार्य सुरू करण्यात आले होते. आज दुपारी शोधकार्याला यश आलेले आहे. ह्या युवकाचा उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपल्यासह सर्वांची काळजी घेऊन पाण्यात जायला पाहिजे अशी अपेक्षा स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.