
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील श्री सिद्धिविनायक गणेशाचे मनमोहक, आकर्षक व निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर भाविक वा गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सव काळात हा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून निघत आहे. येथील मनमोहक मंदिरामुळे इगतपुरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. संजय अनंत तुपसाखरे यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर व मूर्तीची स्थापना केली आहे. मुंबईच्या “सिद्धिविनायकाचे प्रतिरूप” हे या ठिकाणी दर्शनरुपात पहावयास मिळते. या मंदिराची आकर्षक रचना, व मूर्ती व निसर्ग सौंदर्याचा ठेवा पहाताच गणेश भक्तांचे मन भारावून जाते. सर्व संकष्ट चतुर्थी, प्रत्येक मंगळवार, गणेशजयंती, अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव आदी कालावधीत “श्री”च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गणेशोत्सव काळात महायज्ञ, महागणेशयाग, महापूजा, “श्रीं”ची मिरवणूक तसेच पालखीसोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होत असतात. यावेळी पावसाने उघडीप दिल्याने भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक महागणपती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी केले आहे.