जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगाराला घातक अग्निशस्त्रासह अटक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेवुन त्याचेवर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी हा दहशत पसरविण्याचे उद्‌देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नांदगाव सदो परिसरात सापळा रचुन सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा, वय २०, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहे. आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्णा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटला असून, त्याच्याविरूध्द इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुरनं १६६/२०२४ भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात इगतपुरीतील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रूपये लुटमार केल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्यासह घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात चोरी व आर्म ॲक्टच्या गुन्ह्यातही हा आरोपी फरार होता. त्याला अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, संदीप झाल्टे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाउसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!