भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला काही काळातच सुरुवात होणार आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. यातच स्थानिक आणि बाहेरचे उमेदवार हा विषय जास्तच पसरत चालला आहे. इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात मतदारसंघाच्या बाहेर जाऊन विजयी होणारे व्यक्ती आहेत तर तालुक्यातील आपला मूळ जिल्हा परिषद गट सोडून अन्य गटात विजयी झालेले व्यक्ती सुद्धा आहेत. १९९२ मध्ये प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे हे जिल्हा परिषदेच्या नाशिक तालुक्यातील शिंदे ह्या गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तदनंतर ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याच प्रयत्नांनी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांना राज्यमंत्री दर्जा आणि लाल दिवा वाहन देण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सौभाग्यवती अनिता बोडके सुरगाणा तालुक्यातील भवाडा जिल्हा परिषद गटातून राजघराण्यातील दिग्गज व्यक्तीचा पराभव करून निवडून आल्या होत्या. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ ह्या एकलहरे गट ( ता. नाशिक ) येथून विजयी झाल्या होत्या. पुढे त्यांनी शिरसाठे गटातून विजय मिळवला होता.
तत्कालीन शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या सौभाग्यवती अंजनाबाई जाधव ह्या शिरसाठे गटातून निवडून आल्या होत्या. तत्कालीन आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित ह्या वाडीवऱ्हे गटातून विजयी झाल्या होत्या. घोटीचे माजी सरपंच मनोहर घोडे यांच्या पत्नी सुमन मनोहर घोडे या खंबाळे गणातून पंचायत समिती सदस्य होत्या. इगतपुरी तालुक्यातील सध्याची राजकीय गणिते पक्ष पार्टी पेक्षा सोयीच्या राजकीय वाटचालीकडे असल्याचे अनेक नेत्या कार्यकर्त्यांच्या पक्षांतरातून दिसून आलेले आहे. परिवर्तन व बदल घडवून आणणारा इगतपुरी तालुक्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाबरोबर अपक्ष उमेदवार निवडून येण्याचीही तालुक्यात उदाहरणे आहेत. पंचायत समितीच्या टाकेद बुद्रुक गणातून हरिदास लोहकरे तर खेड भैरव गणातून सिंधूबाई वाजे हे अपक्ष निवडून आलेले होते. सोयीनुसार राजकीय भूमिका घेणाऱ्या नेत्यांनी तालुक्यातील एकमेव बाजार समिती निवडणुकीत सुद्धा हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात इगतपुरी तालुक्यातील राजकीय वातावरण अनिश्चित असेल यात मात्र शंका नाही.