बच्चे कंपनीसाठी “अधिकारी आपल्या भेटीला” ; कुंदा बच्छाव यांच्यामुळे भावी अधिकाऱ्यांची निर्मिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देणे सुरू केले. ऑनलाईन अभ्यास विद्यार्थ्यांना कंटाळवाणा न वाटता त्यामध्ये अधिकाधिक दर्जा आणि नाविन्यता असावी, ह्यामुळे चिमुकल्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे या उद्देशाने आनंदवल्ली येथील मनपा शाळा क्रमांक 18 च्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव अखंड कार्यरत आहेत. त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी अनेक ऑनलाईन उपक्रम सुरू केले. अँड्रॉइड मोबाईलवाल्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवून झूम व गुगलद्वारे मिटिंगची कला विद्यार्थ्यांना शिकवली. त्यानुसार कुंदा बच्छाव ह्या गुगल मिटिंगद्वारे ऑनलाईन नियमित अभ्यास घेतात. मनोरंजनासह ज्ञान मिळत असल्याने हे ऑनलाईन शिक्षण आनंददायी ठरले. अभ्यासाच्या उत्साही आनंदाचे सातत्य अविरत जपण्यासाठी कुंदा बच्छाव अग्रेसर आहेत. ह्या शैक्षणिक वर्षात त्यांनी विविध ऑनलाईन उपक्रमांद्वारे शिक्षणाची भक्कम गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्मित केली.
कुंदा बच्छाव निर्मित “अधिकारी आपल्या भेटीला” ह्या आगळ्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सोपी होत गेली. या उपक्रमांतर्गत वर्षभरापासून कुंदा बच्छाव यशस्वी आणि गुणवंत अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधण्यासाठी निमंत्रित करतात. यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होऊन मोठ्या पदावर कार्यरत असणारे अधिकारी निवडण्यात आले. ह्या  प्रथम वर्ग श्रेणीतील अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन संवादातुन अभ्यासाचा धडा गिरवता येतो. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे ह्यावर भर देऊन यशाचा मंत्र शिकवला जातो. “अधिकारी आपल्या भेटीला” ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीच करतात.  विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यातील मनमोकळ्या संवादाने भावी अधिकारी घडवण्यासाठीची गुरुकिल्ली सापडते. अधिकारी व्हायचं असल्यास कोणत्या परीक्षा द्यायच्या ? कसा अभ्यास करावा ? आदींचे संपूर्ण मार्गदर्शन ह्या अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना मिळते.
कुंदा बच्छाव यांच्या आनंदवल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम असला तरी फेसबुक लाईव्हमुळे ह्याचा फायदा अनेकांना घेता येतो. नाशिक मनपाच्या विद्यार्थ्यांसह राज्यभरातून अनेक शिक्षक आणि हजारो विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सहभागी होतात. नाशिकच्या शिक्षण सहसंचालक पुष्पावती पाटील, डाएट नाशिकच्या प्राचार्या रत्नप्रभा भालेराव, नाशिकच्या शिक्षण सभापती संगीता गायकवाड, नगरसेवक संतोष गायकवाड, महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे, नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर, उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, डॉ. संगिता  महाजन, जगन्नाथ दरंदले, एसआरपी अशोक चव्हाण, गणित मित्र वाल्मीक चव्हाण, सर फाउंडेशनचे समन्वयक राजकिरण चव्हाण, आरटीओ इन्स्पेक्टर एकनाथ ठाणगे, नासा सल्लागार अपूर्वा जाखडी आदी अधिकाऱ्यांनी अधिकारी आपल्या भेटीला उपक्रमात सहभाग घेतलेला आहे. कुंदा बच्छाव निर्मित उपक्रमातून विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधल्यामुळे विद्यार्थी नक्कीच अधिकारी होतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे विशेष कौतुक करून यासाठी लागणारे साहाय्य करण्यासाठी तत्पर राहू असा शब्दही दिला आहे. “अधिकारी आपल्या भेटीला” हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि कष्ट घेऊन अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे.
कुंदा बच्छाव यांचे “पुस्तके आपल्या भेटीला”, “साहित्यिक आपल्या भेटीला” हे उपक्रम सुद्धा प्रसिद्ध आहेत. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना मानसिक आधार देऊन दैनंदिन संपर्क साधत तंत्रज्ञानाच्या वापराने प्रगल्भ पिढी घडवण्यासाठी कुंदा बच्छाव सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांना नासिक मनपाचे आयुक्त कैलास जाधव, मनपा शिक्षण मंडळ शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, केंद्र मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन मिळते. मनपा शिक्षिका वैशाली भामरे, पूनम भामरे, आनंदवल्ली शाळेचे सर्व शिक्षक यांसह जिल्ह्यातील विविध शिक्षकांकडून सहकार्य मिळत आहे. कोरोनाला समस्या न मानता संधी मानून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार्‍या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

( कुंदा बच्छाव नाशिक मनपा शाळा क्र. १८, आनंदवली ह्या शाळेत शिक्षिका असून त्यांचे नवनवीन उपक्रम प्रसिद्ध आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९४२०६९५०६५)

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!